अहेरी:- नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बूस्ट मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते 9 जुलै रोजी अहेरी मुख्यालयातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, जेष्ठ नागरिक यशवंत दोतूलवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, मुख्याधिकारी एन सी दाते, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आदी पाहुणे मंडळी उपस्थित होते.
पुढे बोलताना गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी आदी छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत तसेच मधुमेह आणि रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यभारत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेचा विस्तार केला जात आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असून जास्तीत जास्त लोकांना दैनंदिन आजारांसाठी प्रभावीपणे या दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार मिळतील, असा विश्वास कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला.
मंत्री पदाची शपथ घेताच उदघाटनांचा धडाका
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतेच 2 जुलै रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 7 जुलै रोजी त्यांचा गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाला. तर 8 जुलै रोजी ते आपल्या निर्वाचन क्षेत्र अहेरी येथे पोहोचले.8 जुलै रोजी दिवस भर विविध कार्यक्रमात व्यस्त होते.जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत अहेरी राजनगरीत त्यांचा विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.लगेच 9 जुलै रोजी सकाळी त्यांनी आपल्याच शहरात ‘आपला दवाखाना’ उदघाटन केले. कॅबिनेट मंत्री झाल्यावर त्यांच्या हस्ते हे पहिलंच उद्घाटन आहे हे विशेष.यावेळी त्यांनी आपला दवाखान्यात असलेल्या सुविधांची पाहणी केली तर येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे यांच्याशी चर्चा करून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले