✍️चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली महाकाली माता यात्रा महोत्सव 27 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सुचना दिल्या.
विविध विभागांचे प्रमुख व मंदिराचे विश्वस्त यांच्यासोबत महाकाली मंदीर येथे घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या यात्रेकरीता केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर राज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे यात्रा महोत्सव सुरळीत पार पडेल, या दृष्टीने सर्व संबंधित विभागाने नियोजन करावे. मंदिर परिसराची व झरपट नदीची स्वच्छता त्वरीत करून घ्यावी. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम असली पाहिजे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा व तयार करण्यात येणा-या शौच्छालयात अचानक काही बिघाड झाल्यास ते त्वरीत दुरुस्त करता येईल, याबाबत योग्य नियोजन करावे.
यात्रेकरीता होणारी गर्दी बघता काही अघटीत घडलेच तर मंदिर परिसरातील घटनास्थळी पोलिस व्हॅन किंवा रुग्णवाहिका त्वरीत पोहचली पाहिजे. एवढेच नाही तर यात्रा महोत्सव कालावधीत या दोन्ही बाबी तेथे असल्या पाहिजे. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा ठेवावा. जेणेकरून भाविकांना सुरळीत आवागमन करता येईल. परिसरात पोलिस चौकी, नियंत्रण कक्ष, वॉच टॉवर उभारावे. तसेच ऑनलाईन दर्शन घेता यावे म्हणून एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
27 मार्च पासून महाकाली महोत्सव सुरू होत असून दरदिवशी किमान 12 ते 15 हजार भाविक तर एप्रिल महिन्याच्या 5, 6 व 7 या तीन दिवसात हा आकडा 20 हजारापर्यंत राहण्याची शक्यता असते. मराठवाडा आणि आंध्रप्रदेशातनू जास्त संख्येने भाविक येत असल्याचे मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिका-यांसह जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी एस.पी. नंदनवार, पोलिस निरीक्षक सतिशसिंग राजपूत, मनपा उपायुक्त अशोक बराटे आदींनी मुख्य मंदीर परिसर, बैलबाजार परिसर, गुरुमाऊली परिसर, महाप्रसादाची जागा, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी येण्या – जाण्याचा रस्ता, बॅरीकेटींग करण्यात येणारी जागा आदी परिसराची पाहणी केली.