प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या
सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
देसाईगंज:महावितरण कंपनीने २०२३-२४ करीता वीज नियामक आयोगाकडे ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असुन प्रस्ताव मान्य करण्यात आल्यास जिल्ह्यातील उद्योगधंद्यांसह सामान्य वीज ग्राहक प्रभावीत होण्याची दाट शक्यता लक्षात घेता सदर प्रस्ताव तत्काळ मागे घेण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके यांनी देसाईगंज येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम,अतिसंवेदनशील भागात वसलेला असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नसल्याने येथील नागरिकांचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महागाईचा प्रचंड भडका उडाला असल्याने येथील नागरीक आधिच संघर्षमय जीवन जगत असुन वाढलेल्या प्रचंड बेरोजगारीमुळे येथील नागरिक हतबल ठरू लागले आहेत.
दरम्यान महावितरण कंपनीने सन २०२३-२४ करीता ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे.राज्यात प्रस्तावित वीज दर लागु केल्यास यामुळे १०० ते ३०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना ४०० ते ८०० रुपयांपर्यंत अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे तर ३०० युनिट पेक्षा जास्त वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना ८०० ते १७०० रुपयांपर्यंत आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
यामुळे व्यापारी, छोटे उद्योजक यांनाही मोठी झळ बसणार आहे तर मोठ्या उद्योगांनाही जवळपास ३० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.यामुळे महाराष्ट्रात नविन उद्योग येणे तर सोडाच आहेत ते देखील महाराष्ट्रातुन निघुन जाण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे.व्यापारी व औद्योगिक दरवाढीचा अंतिम भार सामान्य माणसालाच झेलावा लागत असल्याने आधीच महागाईने ञस्त असलेल्या सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जाणार आहे.तद्वतच आधिच रोजगाराचा वानवा असताना उद्योगधंदे बाहेर गेल्यास प्रचंड बेरोजगारी वाढुन समाजात अराजकतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीच्या निर्णयास तत्काळ स्थगिती देऊन वीज ग्राहकांना दिलासा देण्यात यावा,अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेडमाके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देसाईगंज महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
निवेदन उपविभागीय अभियंता यांनी स्विकारले. यावेळी महिला तक्रार निवारण समितीच्या सचिव डाॅ.जयश्री कुलकर्णी,माजी नगर उपाध्यक्ष निलोफर शेख,वंदना चहांदे,दिनेश्री वरखडे,जया शेंडे,संगीता धोटे आदी उपस्थित होते.
![](https://desaiganjsangharsh.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0208-1024x768.jpg)