नाशिकः पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते सत्यजती तांबे यांनी आज पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत.
आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अपक्ष म्हणूनच भविष्यात काम करणार आहे, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससोबतची साथ सोडून तर भाजपासोबत जातात की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणूनच विजयी झाले. त्यांनी आज त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
एबी फॉर्म चुकीचे देण्यात आले- तांबे
सत्यजित तांबे लढतील की सुधीर तांबे हे ठरलेलं नव्हतं. त्यानंतर मला 9 जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असं पदेशाध्यक्षांनी सांगितलं. तर 11 तारखेला फॉर्म मिळाले. एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजित तांबे यांनी केला आहे. हे फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचं कळवलं नसतं असं सत्यजित तांबे म्हणाले.
