अखेर कुरुड जिल्हा परिषद शाळेची चौकशी सुरू
- सत्यवान रामटेके यांच्या तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल……
देसाईगंज:- तालुक्यातील कुरुड जिल्हा परिषद प्राथमिक(मुले)केंद्र शाळेच्या मोठी दुरुस्ती बांधकामावर बोगस मजूर दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दिनांक- ५ डिसेंबर २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुमार आशीर्वाद यांना माहिती अधिकार कार्यकर्ता सत्यवान रामटेके यांनी तक्रार दाखल करताच सदर तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी सुरू करण्यात आली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
कुरुड जिल्हा परिषद प्राथमिक(मुले)केंद्र शाळेच्या मोठी दुरुस्ती बांधकामावरील प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे.सदर शाळेमध्ये इयत्ता १ ते ४ वर्गाची मुले शिक्षण घेत आहेत.मुलांच्या उज्वल भवितव्याचा विचार करून मोडकी-तोकडी शाळा असल्यास शासनस्तरावरून दखल घेऊन नवीन इमारत वा इमारतीच्या दुरुस्तीस लाखो रुपये दिली जातात. जेणेकरून शाळा ही शाळेसारखी दिसावी व विद्यार्थ्यांना शाळेतील वातावरण ओढवून घेणारे असावे.अशातच इवल्याशा विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या निधीतही घोळ करून आपलीच पोळी शेकून खिसे गरम केले जात असतील तर किती शरमेची व लाजिरवाणी बाब आहे.अशांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे..
चौकशी ही निष्पक्ष व बारकाईने करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.असे सत्यवान रामटेके यांनी प्रतिनिधीस सांगितले आहे.अन्यथा चौकशी अहवाल मागवून योग्य चौकशी न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.