✍️ अर्जुनी मोरगाव: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांना काँग्रेसने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी ‘पार्सल उमेदवार नको, स्थानिक उमेदवार हवा’, अशी मागणी करीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ताफा अर्जुनी मोरगावातील प्रसन्न सभागृहाजवळ आज अडविला.यावेळी ‘पार्सल हटओ, काँग्रेस बचाओ’चे नारेही दिले.
बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे नाना पटोले यांची गाडी स्थानिक इच्छुक उमेदवारांनी रोखून धरली. ‘आम्ही काय चूक केली नानाभाऊ’ असा सवाल करत काँग्रेस कार्यकर्ते पटोले यांच्या ताफ्यासमोर आडवे झाले. पोलिसांनी पटोले यांना सभास्थळापर्यंत नेले. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असल्याने ते सभास्थळाच्या बाहेरच थांबले.
अर्जुनी मोरगावमध्ये अनेक निष्ठावंत आणि इच्छुक पदाधिकारी असताना काँग्रेसने महाविकास आघाडीकडून बन्सोड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांमुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. स्थानिक नेत्यांना डावलत तिरोडा विधानसभा मतदारसंघातून पार्सल पाठवीत आमच्यावर अन्याय केल्याचा काही पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. उमेदवारीसाठी मुलाखती दिलेल्या इच्छुक उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन दिलीप बन्सोड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता.