✍️हिंगोली:दि. 14 : फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी व परिक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात मोबाईलवर बंदी घालण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले.
या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, सहायक कार्यक्रम अधिकारी बी. आर. ठाकूर उपस्थित होते.
परिक्षेचे संचालन सुयोग्य व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे पथक नियुक्त करावेत. जिल्हास्तरावर परिक्षेसाठी कंट्रोल रुम स्थापन करावेत. परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यावर कडक कार्यवाही करावी. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे पथक नियुक्त करुन बैठेपथक सदस्यांनी परीक्षा कालावधीमध्ये एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावेत. परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिका मोहरबंद करुन परिरक्षक कार्यालयात उत्तर पत्रिका पोहोचेपर्यंत सोबत रहावे. कर्मचाऱ्यांनी परिक्षेच्या कामात हयगय किंवा हलगर्जी केल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुध्द कडक कार्यवाही करावी. सर्वांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.
हिंगोली जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) परिक्षेसाठी 33 परीक्षा केंद्र असून या परीक्षा केंद्रावर 14 हजार 121 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च, 2023 या कालावधीत पार पडणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) परिक्षेसाठी जिल्ह्यात 53 परीक्षा केंद्र असून या परीक्षा केंद्रावर 15 हजार 623 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च, 2023 या कालावधीत पार पडणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय मंडळ, औरंगाबाद मार्फत 06 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिनियम 37 (1)(3) व 144 कलम लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले.