राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, असा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहै राज्यात पुढील 2 ते 3 दिवस गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर,गडचिरोली नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढील पाच दिवसात गारपीटाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२० मार्चपर्यंत कोकण वगळता महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी वीजा आणि वारा यासहित किरकोळ पावसाच्या शक्यता आहे. त्या बरोबरच मध्य महाराष्ट्र(नंदुरबार ते सोलापूर), मराठवाड्यात ( छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पर्यंत ) आज गारपीटीची शक्यता जाणवते, तर विदर्भात मात्र आजच्या बरोबर उद्याही गारपीट होवू शकते असे सांगण्यात येत आहे.
